शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित गंभीर आरोप केले. तसेच फडणवीसांनी चार महिन्यांपासून भेट दिली नाही, असा दावा केला. यावर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणं टाळत नाहीत. त्यांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (४ एप्रिल) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस त्यांना उत्तर लिहिण्यास सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणं टाळत नाहीत. विधिमंडळाचं अधिवेशन मोठा काळ चाललं. इतिहासात पहिल्यांदा इतके दिवस अधिवेशन चाललं. त्यामुळे फडणवीसांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल.”

“राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं”

“संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं. तसं झालंही नसेल आणि झालं असेल, तर केवळ देवेंद्र फडणवीस व्यग्र असल्याने झालं असेल. ते राऊतांना वेळ देतील,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा : संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, म्हणाले, “बाजार बुणगे…”

चंद्रकांत पाटलांनी राऊतांच्या मोदींवरील टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. हे सामान्य माणसाला आवडत आहे असं नाही. आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे. आपली गंगाजळी म्हणजे परकीय चलन सुधारलं. अनेक देशांनी रुपयात व्यवहार करण्यास मान्यता दिली. या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते व्यवस्थित वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही पाहतात.”

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘फडतूस गृहमंत्री’ अशी टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “लाळ घोटत…”

“मोदींवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

“इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अशा माणसावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही. एखादा माणूस कशाचाही परिणाम करून घेत नसेल, तर त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरी त्याचं समाधान केवळ शिव्या देणाऱ्याला असतं,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil answer allegations of sanjay raut about meeting devendra fadnavis pbs