विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधीमंडळ अधिवेशनात पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्यावरून जोरदार टीका केली. तसेच पुण्याचे प्रश्न न मांडले गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत पुण्याला कुणीच वाली राहिला नसल्याचा टोला पुण्यातील भाजपा आमदारांना लगावला. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवलं नव्हतं,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वतःचे अधिक अधिकार वापरतात. ते त्यांनी पुण्यासाठी वापरायला अडचण नव्हती. खरंतर सभापतींनी सर्वांचं ऐकायचं असतं. परंतू, सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात. सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचं नसतं, तर या पक्षाचा प्रवक्ता बनतात. त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवलं नव्हतं.”
“त्यांनी पुण्यासाठी काय काय केलं याची यादी द्यावी”
“अडीच वर्षांचं सरकार होतं, थोडंथोडकं नाही. त्या काळात त्यांनी पुण्यासाठी काय काय केलं याची यादी द्यावी,” अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी केली.
“पालकमंत्री नाही म्हणून काही थांबलेलं नाही”
चंद्रकांत पाटलांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला होणारी दिरंगाई यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “दोघेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते त्या काळातही निर्णय घेणं थांबवलेले नाहीत. नंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपाला उशीर झाला. त्यानंतरही कोणतेही निर्णय थांबले नाही. पालकमंत्री नसण्याचं मी समर्थन करत नाही, मात्र, पालकमंत्री नाही म्हणून काही थांबलेलं नाही. लवकरच पालकमंत्र्यांचीही नेमणूक होईल.”
राज्यात बहिष्काराच्या घटनांमध्ये वाढ, चंद्रकांत पाटलांकडून भूमिका स्पष्ट
बैलपोळा साजरा केल्याने धुळ्यात दलित कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा प्रकार घडला. यानंतर राज्यात इतरही ठिकाणी अशा घटना घडत असल्याचं समोर आलं. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी या घटनांची माहिती घेईन. या प्रत्येक घटनेचा सह्रदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे.”
हेही वाचा : “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…
“आम्ही गावोगावच्या अशा घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. त्या घटनांमध्ये काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल,” असं आश्वासन पाटलांनी यावेळी दिलं.