पुणे : ‘चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला, तसेच आपल्या आजुबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून, नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी’, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.
पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागाकडून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तीन कोटी ८४ लाख रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-पुणे शहरातील बांगलादेेशी घुसखोर, त्यांच्या समस्येबाबत सूचक भाष्य केले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संभाजी कदम, स्मार्तना पाटील यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘बांगलादेशी घुसखोरांचा पुणे-मुंबईत वावर आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात बांगलाादेशी नागिरकाला पकडण्यात आले होते. अगदी आपल्या घरासमोर, तसेच रस्त्यावरील फेरीवालाही बांगलादेशी असू शकतो, याची अनेकांना जाणीव नसते. अशा वेळी नागरिकांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. एखादा फेरीवाला, मजूर बांगलादेशी असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पुण्यातील लोकसंखा, विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलीस दलातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनासकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे पोलीस दलाला येत्या काही महिन्यात एक हजार पोलीस शिपाई उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.’
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे आदेश
बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. घुसखोरांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे, तसेच घुसखोरांना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे-मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
ऐवज परत करण्यासाटी न्यायालयीन पाठपुरावा
दागिने, मोबाइल चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत देण्यात येतो. याबाबतची प्रक्रिया त्वरीत पार पाडण्यासाठी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज एक महिन्यांच्या आत तक्रारदारांना परत करण्यात यावा. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज परत करणे ही पाेलिसांची जबाबदारी आहे. याबाबतचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
वाहतूक समस्या सोडविण्यास प्राधान्य
पुणे शहर जगातील चौथे कोंडीचे शहर आहे, असे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. पुण्यात वाहतूक कोंडी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. अतिक्रमणांवर कारवाई, रस्त्यांची दुरस्ती, तसेच वाहतूक विषयक सुधारणेसाठी उपाययोजना केल्याने वाहतूक गतिमान झाली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरातील खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारींची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.