अविनाश कवठेकर

पुणे : पालकमंत्री पद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, अशी सारवासारव राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी केली.

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री होण्यासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्धही रंगले होते. सत्तेतील नव्या मित्रासाठी झळ सोसत अजित पवार यांच्यासह त्यांच्या आमदारांना विविध जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचे कारनामे… तस्करीच्या पैशातून सोने, जमीन खरेदी

यापार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत भाष्य करताना सारवासारव केली. पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणीही नाराज होण्याचे कारण नाही. एका मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणूक जिंकणयाची आता संधी आहे. यावेळी जिंकलो नाही तर पुन्हा कधीच नाही, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघ काबीज करमय़ासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करावे लागेल. पालकमंत्री पद सोडण्यासाठी मी केलेली तडजोड ही राज्यात ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीची आहे. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. पालाकमंत्री नसलो तरी व्हीआयटी सर्किट हाऊसमधील माझी दोन्ही कार्यालये सुरूच राहणार आहेत. मी पूर्वीसारखाच पुण्यात काम करणर आहे. सर्वांना भेटणार आहे. पूर्वसारखाच निधी आणणार आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता कामे करणे योग्य राहणार आहे.