पुणे : ‘मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दलित, मराठा, ओबीसी समाजासाठी सुविधा दिल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात हा समाज जाऊ शकत नाही,’ असा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला.महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपटावरून महाराष्ट्रात वाद सुरू झाला असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस का गप्प बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल, अशी टीका राऊत यांनी केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, ‘खासदार राऊत यांच्या मनामध्ये असलेला हा जातिवाद आहे. तो कधीही अस्तित्वात येऊ शकणार नाही. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना फडणवीस यांनी नेहमी सर्वच समाजाला न्याय दिला आहे.

२०१४ ते २०१९ या काळात आरक्षणाची सुविधा या एकमेकांंमध्ये अडकल्या होत्या. फडणवीस यांनी त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही या समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा, वसतिगृहे, भत्ता दिला. त्यामुळे फडणवीस यांच्या विरुद्ध दलित, मराठा, ओबीसी समाज जाऊ शकत नाही.‘ओबीसींचे मंत्रालय फडणवीस यांनी वेगळे सुरू केले. फडणवीस विरुद्ध फुले-आंबेडकर अशा प्रकारचा जातिवाद खासदार संजय राऊत यांच्याच मनात आहे.’ असे पाटील म्हणाले.