भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडी आणि सीबीआय कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच या कारवायांवर आरोप करणाऱ्या विरोधकांना घटना मान्य नाही का? असा सवाल केलाय. यावेळी चंद्रकांत पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ आमदारांच्या निलंबनावरील निर्णयावर बोलणं म्हणजे न्यायालय भाजपाच्या बाजूने निर्णय देतंय असं म्हटल्यासारखं असल्याचं वक्तव्य केलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “विरोधकांनी कारवायांवर केलेल्या आरोपांवर मी वारंवार हेच उत्तर देत आलोय की याचा अर्थ तुम्हाला घटना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची ही सर्व रचना केली. घटना म्हणजे काय, तर काय झाल्यावर काय करावं. यात केंद्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय, उच्च न्यायालय म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय, ईडी म्हणजे काय, सीबीआय म्हणजे काय, रिझर्व्ह बँक म्हणजे काय हे घटनेत आहे.”
“…त्याचा अर्थ न्यायालय भाजपाच्या बाजूने निर्णय देतो असा होतो”
“तुम्ही रिझर्व्ह बँकेवरही बोलणार, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या निलंबनावरही बोलणार. त्याचा उलटा किंवा सुलटा अर्थ असा होतो की न्यायालय भाजपाच्या बाजूने निर्णय देतो. त्यामुळे तुम्हाला न्याय मागायचा असेल तर न्यायालय आहे. तिथं जाऊन न्याय मागा. आतापर्यंत ईडी आणि सीबीआयने ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्या सर्वांना जेलपर्यंत जावं लागलं. काही तुरुंगात आहेत आणि काही तुरुंगाबाहेर आहेत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
“… तर किरीट सोमय्यांच्या डोक्याचा, मेंदूचा चिवडाच झाला असता”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “सर्व सत्तेचा दुरुपयोग चालला आहे. किरीट सोमय्यांवर प्राणघातक हल्ला झाला. व्हिडीओ क्लिपमध्ये दिसतं की एकजण मोठा दगड घेऊन मागे धावतो आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्याचा, मेंदूचा चिवडाच झाला असता. त्याच्यावर ३०७ नाही.”
हेही वाचा : “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
“लोकशाहीने आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा, निदर्शनं करण्याचा अधिकार दिला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पायरीवर सोमय्या यांना पाडण्यात आलं तिथं सत्कार केला. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आणि त्यात रेटारेटी झाली. त्यांच्यावर मात्र लगेच गुन्हे दाखल झाले,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.