पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. मात्र त्याच दरम्यान भाजपकडून उमेदवारांची पहिला यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात बैठकादेखील सुरू झाल्या आहेत. आज पुण्यात भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून अनेक राजकीय घडामोडींबाबत भाष्य केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रामध्ये दौरे वाढले आहेत. तर भाजप ४०० चा आकडा कसे पार करते हेच पाहतो, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांना (संजय राऊत) भाजप माहिती नाही. परवा भाजप संसदीय मंडळाची बैठक पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घरी गेले आणि सकाळी आठ वाजता पाच देशांच्या प्रवासाला निघाले. संजय राऊतांना ही सवय आहे का ? तर आमच्या नेत्यांना ही सवय आहे. ती म्हणजे खूप प्रवास करायचा, अनेक ठिकाणी भेटी द्यायच्या, जिथे विजय मिळणार असेल तिथे जाऊन सांगतात गाफिल राहू नका आणि आपलं काम नीट करा, पण यांना (संजय राऊत) प्रवासाची सवय नाही. आता पर्याय नाही म्हणून सर्वजण घराबाहेर पडले आहेत.
मंत्री, खासदार, आमदारांना भेटत नव्हते. तुम्ही जर आम्हालादेखील भेटणार नसाल तर कशाला काम करायचे, त्यामुळे मग लोकांनी बंड केले. त्या बंडाचा चांगला परिणाम झाला असून आता प्रवास करायला लागले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तुलनाच करू शकत नाही. अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे सोबत राहिलेले सहकारी टिकवता आले नाहीत. त्यांच्या नाकाखालून कधी गेले हे त्यांना कळलेच नसल्याचे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.