पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. कोथरूड भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती. या भेटीमध्ये कोथरूड भागातील मिसिंग लिंकचे काम करण्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा अशी मागणी पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री,आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मिसिंग लिंक संदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक निधी देण्यासाठी शिंदे यांना निवेदन दिले. कोथरूड भागातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात या भागातील सोसायटीमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून रखडलेले मिसिंग लींक सुरू करावेत यासाठी आंदोलन देखील केले होते. महापालिकेच्या वतीने देखील रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. कोथरूड भागातील वाहतुकीचा प्रश्न नक्की कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त तसेच पथविभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे. कोथरूड भागातील मिसिंगलिंगची कामे करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून संपूर्ण शहरातील मिसींग लिंक ची कामे करण्यासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने यातील निम्मा भार उचलावा अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.

या भेटीबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  पुणे  शहरातील कोथरुड मतदारसंघात एका बाजूने मुंबई-हिंजवडी मार्गे आणि दुसऱ्या बाजुने सातारा मार्गे येणारी अवजड वाहनांसह प्रचंड वाहतूक आणि  मुंबईकडून पुण्याच्या पुढे जाणारे प्रवासी आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी  नागरिकांना  सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना नाईलाज म्हणून  मुंबई-सातारा मार्गावरील सध्याच्या पुणे बायपास मार्गावरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ही गंभीर समस्या वेळेत सोडविणे आवश्यक आहे. यासाठी  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी  याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. 

 पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करून यासाठी आवश्यक  निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून या विकासकामाला अधिक गती देण्यासाठी रोड टीडीआर (ट्रान्स्फर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स) निर्माण करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच जे विकासक रोड टीडीआर घेण्यास इच्छुक असतील, त्यांना दोन टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगून यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे, आश्वासन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.