पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ जोडावी लागणार असून, ८०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारने द्यावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि शहरातील रस्त्याच्या मिसिंग लिंक संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत बैठक घेतली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, ‘शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असून, वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. यासाठी अर्धवट राहिलेल्या मिसिंग लिंकची कामे झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी महापालिकेला द्यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.’
‘नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत नाहीत. अनेक भागात रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा संबंधित मालक महापालिकेला देत नाहीत. यामुळे अनेक मिसिंग लिंक तयार झाल्या आहेत. जागा मालकाला टिडीआर, एफएसआय नाही तर रोख मोबदला हवा आहे. प्रत्येकालाच रोख मोबदला द्यायचा झाल्यास महापालिकेला ते शक्य नाही. महाप्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३१ मिसिंग लिंक अशा आहेत, त्या पूर्ण केल्या तर शहरातील अनेक भागांतील वाहतुकीचा प्रश्न सुटेल. या मिसिंग लिंकसाठी सर्वसाधारण ८०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.’ असेही पाटील म्हणाले.
‘कोथरुड विधानसभा मतदार संघात १५ मिसिंग लिंक आहेत. या लिंक जोडण्यासाठी सर्वसाधारण ३७३ कोटी रुपये लागणार आहेत. या मिसिंग लिंकची कामे तातडीने व्हावीत, यासाठी यातील निम्मे पैसे राज्य सरकारने द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना महापालिका प्रशासनाने देखील शहरातील मिसिंग लिंक जोडण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.