राज्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी, स्वस्त दरात अन्नपदार्थ तसेच महिलांसाठी निवास व्यवस्था आणि सुलभ शौचालय या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पणन मंडळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे आदेश दिले. खासदार संजय काकडे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे या वेळी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील ३०२ बाजार समित्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरविणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक बाजार समितीच्या आवारात महिलांसाठी निवाऱ्याची व्यवस्था आणि चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहेही उभारण्यात येणार आहेत.
काटा मारल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरण्याची सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ज्या बाजार समित्या इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरणार नाहीत तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करतील त्यांना राज्य सरकार आणि पणन मंडळातर्फे कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा