भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. दरम्यान, आज त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
हेही वाचा – चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे, हिंमत असेल तर समोर या”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा – Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई
“अशा गोष्टींमुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देतो आहे. सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. मात्र, आता महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. या घटनेचाही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उद्धव ठाकरे आणि आता या घटनेचाही निषेध करावा, असं मी त्यांना आवाहन करतो”, असंही ते म्हणाले.
“आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुट दिली तर काय होईल? पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात. माझ्या विधानानंतर मी लगेच स्पष्टीकरण दिले होते. मुळात एका गिरणी कामगाराचा मुलगा या पदापर्यंत पोहोचणे, हे सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना झेपत नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले सुरू आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
“पैठणमधील कार्यक्रमात मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्तृतीसुद्धा केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. मात्र, शाळा सुरू करताना ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत, असे मी म्हणालो होतो, फक्त मी ‘लोकसहभागातून’ हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, आम्ही ग्रामीण भागातील लोकं आहोत. त्यामुळे आम्ही ग्रामीण भाषेत बोलतो. हेच या सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना सहन होत नाही”, असेही ते म्हणाले. तसेच या घटनेबाबत चौकशी करताना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला दोषी न ठरवता, त्यांच्यावर कारवाई होऊ नये, असेही आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केले. याचबरोबर कार्यकर्त्यांनीही शांतता राखावी, असेही ते म्हणाले.