भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराला चंद्रकांत पाटलांनी हुसकावल्याचं दिसत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पुण्यातील बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आपल्या वाहनात बसत होते. यावेळी एक पत्रकार त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी आला. संबंधित बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत विचारलं असता, चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावून लावलं. “काम नाही, धाम नाही, घरी जा…तुझी बायको वाट पाहतेय” असं चंद्रकांत पाटील म्हटल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचं उद्घाटनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने नियंत्रण केले जाणार आहे.

Story img Loader