पुणे : भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत असे विधान केल्यानंतर काल पिंपरी चिंचवडमधील भाजपचे पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकली.
या घटनेप्रकरणी समता सैनिक दलाचे मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर राज्यभरात भाजपकडून निषेध नोंदविण्यात येत असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे पुणे शहराध्यक्ष अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी चालत जात भाजपने निषेध नोंदविला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.