Chandrakant Patil : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एका आठवड्यानंतर (२१ डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. खरं तर खातेवाटप कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. एवढंच नाही तर खातेवाटप करण्यास उशीर झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, अखेर खातेवाटप झालं. मात्र, खाते वाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदाचं वाटप कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. यातच पालकमंत्री पदावरून आता महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

आता कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणत्या नेत्यांकडे जाणार? तसेच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणत्या पक्षाकडे जाणार? यावरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. असं असलं तरी पालकमंत्री पदाचे वाटप पुढच्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, असं असलं तरी पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? असं चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारलं असता त्यांनी सूचक भाष्य केलं. “माझा पक्ष आणि माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”

पालकमंत्री पदाचं वाटप कधी होणार?

“जेव्हा निवडणुकीत एवढं मोठं बहुमत मिळतं. तेव्हा त्यामधून फक्त काहीजण निवडणं, मग त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना खातेवाटप करणं, मग त्यामध्ये काही जिल्ह्यात चार-चार मंत्रिपदे झाले आहेत. सातारा आणि पुणे जिल्ह्यात चार-चार मंत्रि‍पदे आहेत. मग त्यामध्ये त्यातील कोणाला पालकमंत्री करायचं? मग एकाला पालकमंत्री केलं तर राहिलेल्या तिघांचं काय? त्यामुळे हा एवढा सोपा विषय नाही. मात्र, मला वाटतं की आता खातेवाटप झालंय, लवकरच पालकमंत्री पदाचंही वाटप होईल”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं तर स्वीकारणार का?

पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझं नेहमीचं ठरलेलं उत्तर असतं. माझा पक्ष आणि माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते काम मी उत्तम करतो. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हे खातं अडीच वर्षांपूर्वी होतं. मग अनेकांना वाटलं मला बाजूला केलं. मात्र, नवीन शिक्षण धोरण अवलंबण्याची गरज होती. त्यामध्ये मी चांगलं काम केलं. आताही आमचं नेतृत्व जे ठरेवेल त्याचं मी सोनं करेन”, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.

Story img Loader