राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदाणी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अदाणी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीपेक्षा ( जेपीसी ) सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल, असं मत शरद पवारांनी मांडले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “शरद पवार अदाणींची चौकशी जेपीसीने नव्हे, तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

हेही वाचा : “सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येत, तर आमची…”, शरद पवारांचे नाशिकमध्ये विधान

चंद्रकांत पाटील म्हणाले, “तीन पक्ष एकत्र येऊन लढले, तरी आमच्यासमोर आव्हान नाही. कारण, पुढील वर्षी लोकसभा नंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. तोपर्यंत हे सर्वजण एकत्र राहणे अशक्य आहे. एकत्र राहिले तरी, उमेदवारीवरून वाद होण्याची शक्यता आहे.”

“चार पक्ष वेगळे लढले, तरी आम्ही एक नंबरलाच राहणार आहोत. थोडाफार मतांमध्ये फटका बसण्याची शक्यता असते. मात्र, आम्ही २०० च्या वरती जागा जिंकू,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

“सावरकर आणि अदाणी प्रकरणात शरद पवारांनी बाजू घेतली की, मध्यस्ती करण्याचे कारणच उरत नाही. शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत. ते असल्याशिवाय सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत. ते बाहेर पडले की, बाकीचे गळून पडतात. त्यामुळे शरद पवार सावरकरवादी झाले किंवा सावरकरांवर खालच्या स्तरावर टीका करू नका असे सांगत असतील. अथवा अदाणींची चौकशी जेपीसीने नव्हे तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांशी”, शरद पवारांच्या वक्तव्याला शिंदे गटातील मंत्र्याचे प्रत्युत्तर; म्हणाले…

शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? असा प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, “दीड वर्षात अनेकजण गळून पडतील. कारण, भाजपाच्या विरोधात लढणे सोपे नाही आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil on sharad pawar over adani and veer savarkar issue ssa