पुण्यातील कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात आज दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला जवळपास ५० हजाराहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे.तसेच दिलजीत दोसांझ यांच्या आजवरच्या कार्यक्रमाची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता.पण आता थेट कोथरूडचे भाजपचे जेष्ठ नेते आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
या कार्यक्रमाबाबत चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे भूमिका मांडत म्हणाले की,पुण्यात कोथरूडमधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच पण एक नागरिक म्हणून माझा विरोध आहे.फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे.त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा,अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तसेच असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे.त्यामुळे कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन,असे देखील या निवेदनात म्हटले आहे. तसेच दिलजीत दोसांझ यांच्या म्युझिक कॉन्सर्ट चा कार्यक्रम काही तासांवर आला असून आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.