लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला ४२ वर्षांपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तिन्ही आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस असतानाच आता भाजपचे जेष्ठ नेते, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले. पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याचे विधान केले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बनसोडे यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेला महायुतीत राष्ट्रवादीला केवळ पिंपरीची जागा मिळाली. पिंपरीतून अण्णा बनसोडे तिसऱ्यांदा विजयी झाली आहेत. त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी शहर राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्याबाबत ठराव मंजूर करून राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांना पाठविला आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. सत्तेत सहभागी होताच महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शहरातील एकमेव आमदार बनसोडे यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. भाजपने शहरात विधानपरिषदेचे दोन आमदार दिले. त्यामुळे शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी पदाधिका-यांनी केली आहे.
आणखी वाचा-लष्कराच्या भात्यात आता नवे परिणामकारक शस्त्र… जाणून घ्या सविस्तर…
राष्ट्रवादीने मंत्रिपदासाठी आग्रह केला असताना आता भाजपचे जेष्ठ नेते, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले. चंद्रकांत पाटील यांनी विजयी झालेल्या शहरातील तिन्ही आमदारांची भेट घेतली. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांचा ताफा पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डीतील कार्यालयाकडे वळला. मोटारीतून खाली उतरताच आमदार पाटील यांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याचे विधान केले. त्यामुळे बनसोडे यांना मंत्रिपद मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.