पुणे : ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पुण्यातून उमेदवारी मिळाली तेव्हा माझ्यावर ‘बाहेरचा’ अशी टीका झाली. मात्र, मी शांत राहून काम केले. या निवडणुकीत मी राज्यातील सहाव्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालाे. त्यामुळे मी पुणेकर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ अशा शब्दांत राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरील झालेल्या टीकेला उत्तर दिले.
पुणे पुस्तक महोत्सवासंदर्भातील व्यापक नियोजन बैठकीवेळी त्यांनी या टीकेला उत्तर दिले. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी तत्कालीन आमदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर पाटील यांच्यावर ‘बाहेरचा’ अशी टीका सुरू झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता. हा धागा पकडून पाटील म्हणाले, ‘मी सन १९८२ पासून पुण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत पुण्यातून मला उमेदवारी मिळाली. तेव्हा ‘बाहेरून आलो’ अशी टीका माझ्यावर झाली. त्या परिस्थितीमध्ये मी शांत राहिलो. प्रामाणिक काम केले. त्यामुळेच मी राज्यात सहाव्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालो. त्यावरून मी पुणेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.’
हेही वाचा >>>पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
कलमाडींमुळे शहराला सांस्कृतिक महोत्सवाची सवय
‘शहराला मोठ्या सांस्कृतिक महोत्सवाची सवय माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी लावली,’ अशा शब्दांत अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी कलमाडी यांचे पुणे पुस्तक महोत्सवाच्या व्यासपीठावरून कौतुक केले. कलमाडी यांना पुणेकरांची नस कळाली होती. राजकीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले. कलमाडी यांनी सुरू केलेल्या महोत्सवाला त्यांनी तीन कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही तरडे यांनी नमूद केले. दरम्यान, पुणे राज्याचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, पुण्याला सांस्कृतिक मंत्रिपद आजपर्यंत मिळालेले नाही, असे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहत तुम्ही हे मंत्रिपद पुण्यासाठी आणा, अशी मागणीही तरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.