भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आज पत्रकारपरिषदेत उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच, या हल्ल्यामागे जे सुपातून जात्यात जाणार आहेत ते असल्याचं ही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी वारंवार हेच सांगतोय की, सत्तेचा प्रचंड दुरुपयोग सुरू आहे. आमचंही सरकार होतं पण तेव्हा कधीही पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव नव्हता. परंतु आता पोलीस अधिकाऱ्यांवर एवढा दबाव आहे, की गुन्हे दाखल देखील झालेले नाहीत. जो एफआयआर आहे तो हास्यास्पद आहे. असं नाही झालं ना की, घडलेलं कुणाला माहीतीच नाही. घटनेच्या सर्व क्लिप्स समोर आलेल्या आहेत, त्या बघितल्यानंतर निर्णय पोलिसांनी करावा. की यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न होता की नाही? पण आम्हाला कशाचीच या सरकारकडून अपेक्षा नाही.”
तसेच, “ आजच मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रात सगळा घटनाक्रम, सगळ्य क्लिप्स आणि सगळे फोटग्राफ्स व सगळी कात्रणं त्यांना पाठवली आहेत. मी त्यांना विनंती केली आहे की, महाराष्ट्र सरकार आम्हाला न्याय तर देणार नाही. गावोगाव कार्यकर्त्यांना विविध खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं चाललेलं आहे. पोलिसांवर दबाव आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. अशी विनंती अमित शाह यांना मी केलेली आहे.” अशी माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
याचबरोबर, “ या हल्ल्यामागे कोण आहे हे स्पष्टच आहे. कारण, ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांच्या पाया खालची वाळू इतकी घसरली आहे, त्यांच्या अगदी गळ्याशी आलेलं आहे. कुठल्याही क्षणी विविध तपास यंत्रणा त्यांच्याजवळ पोहचू शकतात. त्यामुळे हीच संस्कृती आहे, की एखाद्या विषयात जेव्हा उत्तर देता येत नसेल, पळून जायचं असेल, बचाव करायचा असेल त्यावेळी समोरच्याचा आवज बंद करायचा. सोपं आहे का? किरीट सोमय्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, थेट त्यांचं लोकसभेचं तिकीट भाजपाने देऊ नये असं म्हणत, युती त्यासाठी पणाला लावली. शेवटी आम्ही एका सुसंस्कृत पार्टीतले असल्याने, नको वाद असं म्हणून आम्ही किरीट सोमय्यांवर अन्याय केला. त्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. किरीट सोमय्या देखील बळी पडणार नाहीत. लोकसभेचं तिकीट नाकारल्यानंतर देखील ते तेवढ्याच जोशाने पार्टीचं काम करत आहेत. त्यामुळे यामागे कोण आहेत तर जे आता सुपातून जात्यात जाणार ते आहेत.”