पुणे : सूस खिंडीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी. तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करून पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने देण्यात यावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा : पुरंदर विमानतळासाठी जमिनी न देण्याचा सात ग्रामपंचायतींचा ठराव; फडणवीस यांना निवेदन
पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सूस खिंड उड्डाणपुलाची पाहणी चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. या कामाचा आढावाही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणींची माहिती घेतली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे, वाहतूक शाखेचे श्रीनिवास बोनाला, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूस खिंड उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून, या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले, तरी सेवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यासोबतच सूस भागातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. प्रामुख्याने सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, कचरा प्रक्रिया प्रकल्पाची भिंत मागे घेऊन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे, त्याचप्रमाणे उड्डाणपुलासाठी अधिग्रहित केलेल्या जमीन मालकांना त्याचा मोबदला तातडीने देण्याची सूचना पाटील यांनी केली.