केंद्र सरकारने पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या जागेला परवानगी नाकारल्यानंतर पुण्यात यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीश बापट हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला सहभागी झाले होते, तर महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, MCCIA चे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रवीण गिरबाणे हे सर्व प्रत्यक्षात सहभागी झाले. बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. मात्र, बोलता बोलता त्यांच्या तोंडून असं वाक्य निघालं की त्यांना ते वाक्य मागे घेतो असं म्हणावं लागलं.
नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पुण्यातील उद्योग क्षेत्राकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेऊन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात MCCIA च्या कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूला भाजपाचे राजेश पांडे, संदीप खर्डेकर, तर उजव्या बाजूला महापौर मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे हे होते. त्यावेळी बैठकीमधील अनेक मुद्दे चंद्रकांत पाटील सांगत होते. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्यामध्ये सेवानिवृत्त एअर मार्शल भुषण गोखले आहेत. ते दिल्लीमध्ये अनेक कमिट्यांवर आहेत. त्यांनी वेळ द्यावा, मी आमचे तरुण खासदार सिद्धार्थ शिरोळे यांना एक आग्रह धरला आहे की एक धावपळ करणारा कोणी तरी माणूस लागतो आणि त्यातून रोज काहीना काही सांगणारा लागतो. तसेच मी देखील एअर पोर्टसाठी प्रयत्न करणार आहे.
“भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा तरुण खासदार असा उल्लेख”
चंद्रकांत पाटील यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना खासदार म्हणताच त्यांच्या बाजूला उभे असलेले संदीप खर्डेकर चंद्रकांत पाटलांकडे पाहत राहिले. त्यानंतर पत्रकारांनी तुम्ही आता बोलताना सिद्धार्थ शिरोळे यांना तरुण खासदार असा उल्लेख केला, तर ते भविष्यात खासदार असणार आहे का असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी भविष्यातील अनेक वर्षांमध्ये त्यांनी खासदार होण्याची शक्यता नाहिये, असं म्हटलं.
“त्यामुळे मी चुकून म्हटलेलं वाक्य मागे घेतो आणि…”
चंद्रकांत पाटील आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले, “एक खूप मोठी रांग आमच्याकडे आहे. त्यामुळे मी चुकून म्हटलेलं वाक्य मागे घेतो आणि एक तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे असं म्हणतो. भाजपा हीच पार्टी अशी आहे ज्यामध्ये एक झाला की दुसरा, तिसरा अशी व्यवस्थित रांग तयार होते.”
हेही वाचा : “शिवसेना उत्तर प्रदेश, गोव्यात निवडणूक लढवणार, पण डिपॉझिट…”, चंद्रकांत पाटलांचा टोला
“बाकीच्याकडे एक आता पुढे कोण हा प्रश्न असतो,” असं म्हणत यावेळी चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच भाजपात रांगेत असणारे नेहमीच हेल्दी मूडमध्ये असतात, असंही सांगितलं.