भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त करत माफी मागितली होती. मात्र, त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून एका व्यक्तीने त्यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक कवच लावलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. त्यांनी लावलेल्या फेस मास्कचे फोटो सोश मीडियात व्हायरल होत आहेत.
हेही वाचा- “…त्यांना शरम वाटली पाहिजे”, शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल!
चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते पवनाथडी यात्रेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सांगवी येथे त्यांच्यावर शाईफेक करण्यात येईल, अशी धमकी फेसबुकवरून देण्यात आली आहे. या धमकीमुळे चंद्रकांत पाटलांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिकचा फेस मास्क लावला आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय जिथे त्यांचा कार्यक्रम आहे, तिथेही पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.