पुणे शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी २८ ऑक्टोबरला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये शहराला जादा पाणी मिळण्यासाठी मुळशी धरणाच्या पाण्यासह इतर पर्यायांची चाचपणी करण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी पाण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शहराला पिण्याचे आणि ग्रामीण भागाला शेतीला दिले जाणारे पाणी हा अलीकडे वादाचा विषय झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागासह संबंधित अधिकाऱ्यांची २८ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा

त्यामध्ये शहराला पिण्याचे आणि ग्रामीण भागात शेतीला पुरेसे पाणी देण्याबाबत चर्चा करण्यात येईल. धरणांमधील उपलब्ध पाण्याशिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देणे आणि वाढीव पाणी मिळण्याबाबत इतर काही पर्यायांची चाचपाणी बैठकीत करण्यात येईल. याकरिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुळशी धरणातील पाणी पुण्याला देण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. याबाबतही २८ ऑक्टोबरच्या बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत सध्या २९.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय शहराच्या पूर्व भागाला भामा आसखेड प्रकल्पातून पाणी घेण्यात येते. शहराची लोकसंख्या वाढल्याने पुण्याचा पाणीकोटा वाढवून देण्याची महापालिकेची मागणी असून त्याबाबतचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil will hold a review meeting of water resources department on october 28 to get more water to pune city pune print news amy