पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून पक्ष प्रवेश होत आहेत. मोदी यांच्या विकसित भारत संकल्पासाठी भाजपमध्ये यावे, असे कोणाला वाटत असेल तर त्याचे स्वागच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, लातूरच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचाही या भूमिकेतून पक्षप्रवेश झाला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या घर चलो अभियानामध्ये बावनकुळे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगावचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशी चर्चा सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही विरोध नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. जे पक्षात प्रवेश करतील, त्याचा उपयोग संघटना वाढीसाठी निश्चित होईल. एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर केंद्रीय आणि राज्य पातळीरील समिती त्याबाबतचा निर्णय घेईल. खडसे यांना पक्ष प्रवेशासाठी कोणत्याही संदेशाची आवश्यकता नाही. विकसित भारताच्या संकल्पासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपामध्ये यायचे असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. पक्ष प्रवेशासाठी कोणतीही अडचण नाही.

हेही वाचा – “उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”

खडसे यांच्या भाजप प्रवेशाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही. फडणवीस कधीही खडसे यांच्याविरोधात नव्हते आणि नाहीत. खडसे यांना सर्वात जास्त मानाचे स्थान फडणवीस यांनी पहिल्यापासून दिले आहे; याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी फडणवीस यांना पूर्ण सहकार्य केले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे यांच्याबद्दल सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाहीत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न

सामनाचे अग्रलेख कोणी वाचत नाहीत

अशोक चव्हाण दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासमोर रडले. पक्ष सोडला नाही तर तुरुंगात जावे लागेल असे चव्हाण यांनी सांगितल्याचा दावा सामनाच्या आग्रलेखातून करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना सामनाचे अग्रलेख कोणी वाचत नाही, अशी प्रतिक्रिया बावकुळे यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम झाली आहे. जागा वाटपावर सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. पुढील बैठकीत त्याबाबतचा निर्णय होईल. सातारामध्येही जवळपास जागा वाटपावर निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले.