पिंपरी चिंचवड : खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराड प्रकरणात राजकारण करू नये अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ईडीची नोटीस देऊनही वाल्मिक कराडवर कारवाई का? झाली नाही. असा प्रश्न सुळे यांनी सरकारला विचारला होता. यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बीडच्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष देत असून आरोपींना शिक्षा भेटणारच असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, बीड प्रकरणात सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार कारवाई करत आहे. अनेक जणांच्या चौकशी लावल्या आहेत. या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून आहेत. शेवटपर्यंत लक्ष देतील आणि आरोपींना शिक्षा भेटेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणूनच त्यांना लाडकी बहीण पदाचा अध्यक्ष पद दिलं असेल असे सूतोवाच देखील त्यांनी केले आहेत. परंतु, जर चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा होईल आणि ही सरकारची भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीही भेटू शकतं. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. निवडणुकीत काही गोष्टी बोलाव्या लागतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांना एकत्र येऊन काम करावं लागतं. असं विधान आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर केलं बावनकुळे यांनी केलं आहे.
बाळा भेगडेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई?
मावळ विधानसभा मतदार संघामध्ये बाळा भेगडे यांनी उघडपणे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके विरोधात प्रचार केला होता. बाळा भेगडे यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. यावर बावनकुळे यांनी त्यांचं मत व्यक्त केल आहे. महायुतीचं काम सर्व जणांनी मिळून केलं आहे. काहीजण उमेदवारीवरून नाराज होते. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर आमची शिस्तभंग समिती योग्य निर्णय घेईल. भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. बाळा भेगडे यांनी यावेळी आमचं ऐकलं नाही. असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात बाळा भेगडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.