शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा, तातडीने निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
इंदापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या कुळाचा उल्लेख करून त्यांना आनंद मिळत असेल. यावरून दिसतेय ते किती घाबरलेले आहेत. आज जे आहेत उरले सुरलेले, त्यातील चारच लोक राहतील.”
हेही वाचा : “तुमचा नेता म्हणजे भारत नाही, एवढा क्षुद्र…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही मिंधे गटाला फक्त ४८ जागा देणार. अरे तुमच्या नावाप्रमाणे ५२ जागा तरी द्या त्यांना, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाची खिल्ली उडवली होती. त्यावर बावनकुळेंनी सांगितलं, “जागा वाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपा-शिवसेना युती मिळून २८८ जागा आम्ही लढणार आहोत. लोकसभेतही भाजपा-सेना युती म्हणून लढू. ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आम्हाला जिंकायच्या आहेत.”
हेही वाचा : “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा
भाजपा म्हणजे भ्रष्ट माणसांचा पक्ष, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर बावनकुळेंनी म्हटलं, “भाजपाचे सरकार देशात ९ वर्षापासून आहे. देवेंद्र फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. एकतरी भ्रष्टाचाराचा आरोप आहे. भ्रष्टाचाराच्या बाजूला तुम्ही बसला आहात. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता हे मिळवणारे तुम्ही आहात. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा धर्मच आहे, सत्तेपासून पैसा मिळवायचा. त्यांच्या मांडीवर जावून तुम्ही बसले आहात. भ्रष्टाचाराची भाषा बोलणं तुम्हाला शोभत नाही,” अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली.