पिंपरी : ‘२७ वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचे’ भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘डबल इंजिन सरकार विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्वीकारले आहे. मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे देशाच्या ७५ टक्के भूभागावर भाजपचे सरकार आहे. दिल्लीतील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेस स्वकर्तुत्वाने दिल्लीत हरली आहे. काँग्रेसने जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. आता काँग्रेस मतदान यंत्राला दोष देईल. सकाळचे नऊचे महान प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील असे म्हणत नाव न घेता’ त्यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगविला.

राहुल गांधी यांनी कामठीतून विधानसभेची निवडणूक लढवावी

‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्या कामठी विधानसभा मतदारसंघावर गडबड झाल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे. येथे सलग २५ वर्षापासून भाजप जिंकत आहे. गांधी यांनी २०२९ ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवी असे माझे आव्हान आहे. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही’, असेही बावनकुळे म्हणाले.

एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मी आणि माझा मुलगा यात ठाकरे फसले. त्यामुळे वाटोळे झाले. महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे. एकनाथ शिंदे चार खात्याचे मंत्री असून चांगले काम करत आहेत. महायुती मजबूत आहे. पुढची २५ वर्षे महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल. विकसित महाराष्ट्र करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule statement that delhi victory is a testament to prime minister narendra modis leadership pune print news ggy 03 amy