पुणे : शिवाजीनर-लोणावळा लोकल सेवा दुपारच्या वेळेतही सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या लोकलला ३१ जानेवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. आता दुपारी धावणाऱ्या लोकल आठवड्यात रविवार वगळता इतर दिवशी सुरू राहणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे.
शिवाजीनगर -लोणावळा लोकलच्या दुपारी २ फेऱ्या होतात. त्यात शिवाजीनगरहून दुपारी १२.०५ वाजता सुटून लोणावळ्याला दुपारी १.२० वाजता पोहोचणारी लोकल आणि लोणावळ्याहून सकाळी ११.३० वाजता सुटून १२.४५ वाजता शिवाजीनगर पोहोचणारी लोकल अशा दोन लोकल गाड्यांचा समावेश आहे. आता या गाड्या आठवड्यात रविवार सोडून इतर ६ दिवशी धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे.
आणखी वाचा-पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…
पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या दिवसभरात ४० फेऱ्या होतात. या लोकलने दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ३ या काळात तर लोणावळा-पुणे लोकल सेवा सकाळी १० ते दुपारी २.५० या कालावधीत बंद ठेवली जात होती. यामुळे दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालये दुपारी सुटतात अशा विद्यार्थ्यांना लोकलसाठी काही तास स्थानकावर प्रतीक्षा करीत थांबावे लागत होते अथवा इतर पर्यायांचा प्रवासासाठी वापर करावा लागत होता. त्यामुळे दुपारी दोन लोकल गाड्या सोडण्यास रेल्वेने सुरूवात केली होती.
रविवारी रद्द लोणावळा लोकल
शिवाजीनगर ते लोणावळा
दुपारी १२.०५ वाजता सुटून १.२० वाजता पोहोचणार
लोणावळा ते शिवाजीनगर
दुपारी ११.३० वाजता सुटून १२.४५ वाजता पोहोचणार