पुणे : खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य संघटनांमार्फत त्यांच्या स्तरावर तृतीय क्रमांक विभागून देत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे विभागून तृतीय क्रमांक मिळालेल्या खेळाडूंना खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता राज्य, राष्ट्रीय स्तरासह आशियाई स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धेत तृतीय क्रमांक विभागून मिळालेल्या खेळाडूंनाच ५ टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळणार असून, खेळ संघटनांमार्फत घोषित तृतीय क्रमांकधारक उमेदवारांना ५ टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा >>> बारामतीचा ‘अजित पवार’ राज ठाकरेंना भेटला, मनसे अध्यक्ष म्हणाले, “मला आयुष्यात कधीच…”
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर तृतीय क्रमांक देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकच तृतीय क्रमांक दिला जातो, त्याच खेळाच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांक विभागून दिला जातो. काही सांघिक खेळांमध्ये विभागून तृतीय क्रमांक दिलेल्या खेळाडूंना ५ टक्के आरक्षणासाठी पात्र ठरवण्यात येते, तर काही सांघिक खेळांमध्ये विभागून तृतीय क्रमांक दिला जात नसल्याने ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत. केवळ खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य संघटनांमार्फत त्यांच्या स्तरावर तृतीय क्रमांक विभागून देत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. ही बाब वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवून खेळाडू आरक्षणातून नोकरीसाठी स्पर्धा करणाऱ्या उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक विभागून देण्यात येत असलेल्या संघातील खेळाडूंना आरक्षणाचा लाभ लागू करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार राज्य, राष्ट्रीय स्तरासह आशियाई स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धेत तृतीय क्रमांक विभागून मिळालेल्या खेळाडूंनाच ५ टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळणार असून, खेळ संघटनांनामार्फत घोषित तृतीय क्रमांकधारक उमेदवारांना ५ टक्के खेळाडू आरक्षण लागू करण्यात येऊ नये. शासन निर्णयानंतर होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर क्रीडा स्पर्धांना हा निर्णय लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.