लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी (११ सप्टेंबर) वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. भोसरी, सांगवी, हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बंगर यांनी दिले आहेत.
भोसरी विभागात ११, १३ आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल असणार आहे. फुगेवाडी दापोडी उड्डाणपूल मार्गे शितळादेवी चौकाकडून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे फुगेवाडी चौकातून हॅरीस पुलाच्या भुयारी मार्गामधून बोपोडीकडे जाईल. बाबर पेट्रोल पंप ते भोसरी उड्डाणपुलाखाली जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. या मार्गावरील वाहतूक भोसरी उड्डाणपूल मार्गे पुढे धावडेवस्ती, सद्गुरुनगर चौकातून यू-टर्न मारून भोसरी पुलाखालून दिघी, आळंदीकडे जाईल.
सांगवी विभागातील वाहतुकीत १३ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल राहील. कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहतूक पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले पुलामार्गे वळविण्यात येईल. माहेश्वरी चौकाकडून जुनी सांगवीकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र, जुनी सांगवी मार्गे औंध किंवा पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले पुलामार्गे वळवली जाईल. कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौक तसेच फेमस चौकाकडील मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक काटेपूरम चौकातून डावीकडे वळून वाहने मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप महाविद्यालय महात्मा फुले पुलामार्गे जातील.
आणखी वाचा-गौरी आवाहनासाठी सुवासिनींची लगबग, अनुराधा नक्षत्रावर आज गौरींचे आगमन
हिंजवडी विभागातील वाहतुकीत १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल राहील. टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिकल सर्कल व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्यास बंदी असून वाहने टाटा टी जंक्शन चौकाकडून लक्ष्मी चौक मार्गे जातील. जॉमेट्रिकल सर्कल चौकाकडून मेझा नऊ चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी राहणार आहे. ही वाहने टाटा टी जंक्शन चौक-लक्ष्मी चौक मार्गे जातील. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हिंजवडी गावठाणाकडे जाण्यास बंदी असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, विप्रो सर्कल, फेज एक चौक-जॉमेट्रिकल सर्कल, टाटा टी जंक्शन मार्गे पुढे जाता येईल. कस्तुरी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी, मारुंजी वाय जंक्शन, इंडियन ऑईल चौक,कस्तुरी चौकाकडून हिंजवडीकडे जाण्यास बंदी असेल. ही वाहने विनोदे वस्ती चौक, लक्ष्मी चौक मार्गे जातील. जांभूळकर व्यायाम शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून ही वाहने इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक-विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे जातील.