लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (२० सप्टेंबर) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील रस्ते वाहतुकीस बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक (मंडई) दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मध्यभागातील वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीपर्यंत लागू राहणार आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकातून (अलका चित्रपटगृह) टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर भागातून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी वेधशाळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौकमार्गे पुणे स्टेशनकडे किंवा नेहरु रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

आणखी वाचा-पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाकडून वडिलांचा खून; आई जखमी

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारे दुचाकीस्वार महापालिका भवन येथील टिळक पूल, नदीपात्रातील रस्त्यावरुन अलका चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. बाजीराव रस्ता, तसेच केळकर रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज चौक, गाडगीळ पुतळा, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे.

आणखी वाचा- महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून वीजमीटर बदलणारी टोळी सक्रिय… नागरिकांनी घ्यावी ‘ही’ काळजी

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते बेलबाग चौक, रामेश्वर चौक ते मंडई, शनिपार चौक, सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज चौक या भागात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी पाचनंतर गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज रस्ता, महापालिका कार्यशाळा चौक, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौक ते भगवान महावीर चौक दरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात येणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in traffic in pune city from today roads in the central part will be closed after 5 pm pune print news rbk 25 mrj