‘‘ब्रिटनला शिकायला जाणाऱ्या विद्यार्थासाठीचे व्हिसाचे नियम गेल्या वर्षी बदलले असले, तरी त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस शिक्षण संस्थांना आळा बसला आहे. तसेच अनेक परदेशी विद्यार्थी फारशा चांगल्या दर्जाच्या नसलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असत. ही बाबही व्हिसाच्या नियमांमुळे टाळली जाऊ शकत आहे.’’ असे प्रतिपादन ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त जेम्स बेवान यांनी केले आहे. बेवान यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
बेवान म्हणाले, ‘‘ब्रिटनला शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे व्हिसाचे नियम गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बदलण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार पदवीच्या पात्रतेवर नोकरी करणारा विद्यार्थी तीन वर्षांसाठी नोकरी करू शकतो आणि पुन्हा तीन वर्षांसाठी ती मुदत वाढवून घेऊ शकतो. ब्रिटनमध्ये राहण्याचा आणि शिकण्याचा खर्च भारतातील खर्चापेक्षा नक्कीच अधिक आहे. मात्र या नियमामुळे विद्यार्थी योग्य नोक ऱ्या मिळवू शकतील, तसेच अधिक काळ यूकेमध्ये राहण्याची संधीही त्यांना मिळेल.’’
दोन वर्षांपूर्वी भारतीय विद्यार्थी अनुज बिडवे याच्या झालेल्या हत्येचा संदर्भ घेऊन बेवान म्हणाले, ‘‘आमची सहानुभूती अजूनही अनुजच्या कुटुंबीयांबरोबर आहे. ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांबरोबर सुरक्षिततेबाबत नियमितपणे संवाद साधला जातो. परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ब्रिटन हा एक सुरक्षित देश आहे.’’ ब्रिटनमधील अनेक चांगली विद्यापीठे भारतात येण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी सांगितले.
 मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरबद्दलही चर्चा सुरू
मुंबई-बंगळुरू कॉरिडॉर प्रकल्पाबद्दल राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे बेवान यांनी सांगितले. केवळ औद्योगिक कॉरिडॉरच नव्हे तर नवीन टाऊनशिप्स आणि आयटी पार्क्सचाही या भागात विकास केला जावा असा विचार असल्याचे ते म्हणाले.