पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेत २० प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत. काही प्रभागांमधील भागांमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. महापालिकेने मार्च महिन्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर प्रभागांच्या नावात बदल करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी एकूण ५८ प्रभाग असून त्यातील ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचा, तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा आहे. प्रभागातील आरक्षणांची सोडत लवकरच जाहीर होणार आहे.
पूर्व खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४), पश्चिम खराडी-वडगांवशेरी (प्रभाग क्रमांक ५), वडगांवशेरी-रामवाडी (प्रभाग क्रमांक ६), बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रभाग क्रमांक ११), पंचवटी-गोखलेनगर (प्रभाग क्रमांक १५), शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक १७), छत्रपती शिवाजी महाराज मैदान-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक १९), पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (प्रभाग क्रमांक २०), कोरेगांव पार्क-मुंढवा (प्रभाग क्रमांक २१), मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी (प्रभाग क्रमांक २२), वानवडी गावठाण- वैदुवाडी (प्रभाग क्रमांक २६), कासेवाडी-लोहियानगर (प्रभाग क्रमांक २७), महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ (प्रभाग क्रमांक २८), महात्मा फुले मंडई-घोरपडे पेठ उद्यान (प्रभाग क्रमांक २९), भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (प्रभाग क्रमांक ३२),आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी (प्रभाग क्रमांक ३३), बिबवेवाडी-गंगाधाम (प्रभाग क्रमांक ४०),काळे-बोराटेनगर-ससाणेनगर (प्रभाग क्रमांक ४४), बालाजीनगर-शंकर महाराज मठ (प्रभाग क्रमांक ४९), वडगांव बुद्रुक-माणिकबाग (प्रभाग क्रमांक ५१) अशी प्रभागांची नवी नावे आहेत.