राष्ट्रीयीकृत वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक, गॅस बुक ग्राह्य नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठीच्या कागदपत्रांत बदल करण्यात आला आहे. आता राष्ट्रीयीकृत बँक वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक (पासबुक) आणि गॅस बुक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनायतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तर पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली. गेल्यावर्षी, २०२१-२२ पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅस बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते पुस्तक, इतर स्थानिक बँकेचे खाते पुस्तक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीकृत केलेला भाडेकरार या पैकी कोणतेही एक कागदपत्र गाह्य धरले जात होते. मात्र यंदा यात बदल करण्यात आला आहे.

निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तर निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचेच खातेपुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. इतर पतसंस्था, स्थानिक बँकेचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes evidence documents rte admission process ysh