पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) समाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा – पदवीपूर्व (सीयूईटी-यूजी) ही परीक्षा १५ ते ३१ मे या कालावधीत घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे या नियोजित वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून, त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना सोईचे होण्यासाठी सीयूईटी-यूजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ते ३१ मे या कालावधीत परीक्षा, तर ३० जूनला निकाल जाहीर होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या परीक्षेसाठीची अर्जप्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, वेगवेगळ्या टप्प्यांतील मतदान याची घोषणा निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसांत केली जाईल.

हेही वाचा >>>पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा

या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक विचारात घेता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल कराव्या लागण्याच्या शक्यतेला विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर सीयूईटी-यूजी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर होऊ शकणार आहे.