राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

१२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. “

“जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदीसह इतर २५ भाषांच्या प्रश्नपत्रिका”

“जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदी आणि इतर २५ प्रकारच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. रशियन, फ्रेंच, जापनीज, उर्दू, तेलगू, मल्याळम या विषयांचाही यात समावेश आहे. त्या प्रश्नपत्रिका ओपन झाल्या आहेत. त्यामुळे हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला तरी अन्य ८ विभागांनाही या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागत आहेत,” अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.

हेही वाचा : अहमदनगरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक

“वाहनाला आग लागल्याने अडीच लाख प्रश्नपत्रिका जळून खाक”

“आता या प्रश्नपत्रिकांवर पुन्हा काम करून, त्या पुन्हा छापून वेगवेगळ्या विभागांना पाठवाव्या लागतील. त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या विषयांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. यानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. पुणे विभागाला एकूण १६ लाख प्रश्नपत्रिका लागतात. त्यापैकी अडीच लाख प्रश्नपत्रिकांना आग लागली होती,” असंही शरद गोसावी यांनी नमूद केलं.

Story img Loader