पुणे : स्वारगेट ते कात्रज ही मेट्रो मार्गिका धनकवडी येथील शंकर महाराज समाधीच्या खालून जात असल्याने या मार्गिकेच्या मार्गात थोडा बदल करण्याचे आश्वासन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) देण्यात आले. सद्गुरू शंकर महाराज समाधीला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने हा मार्ग बदलण्याची मागणी सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज ट्रस्टची होती.

ट्रस्टच्य पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महामेट्रोतर्फे स्वारगेट ते कात्रज हा ५.१ किलोमीटर लांबीचा भुयारी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. हा मार्ग धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज समाधीखालून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे समाधीला धोका निर्माण होण्याची शक्यता ट्रस्टने वर्तविली होती. र्ट्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मार्गिकेत बदल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मेट्रो आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या पार्श्वभूमीवर, मार्गिकेत बदल केला जाणार असल्याचे महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले. तसेच, सहकारनगर येथील प्रस्तावित मेट्रो स्थानकासाठी सद्गुरू शंकर महाराजांचे नाव देण्याबाबत किंवा नावात बदल करण्याबाबतची कार्यवाही सरकारी पातळीवर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिकेत बदल करण्यात आलेला नाही. मार्गिका समाधीखालून जात असल्याने त्या ठिकाणी थोडा बदल केला जाणार आहे. धनकवडी, सहकारनगर, कात्रज या ठिकाणच्या मालमत्तेला धोका पोहोचणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Story img Loader