पुणे : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून रविवारी (५ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चानिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाल महाल येथून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

‘छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता, नेहरू रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गाे. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडुजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, काँग्रेस भवनमार्गे महापालिकेकडे जावे. दारूवाला पूल परिसरातून जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. नेहरू रस्त्याने मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी पाॅवर हाउसमार्गे जावे. मालधक्का चौकातून जिल्हाधिकारी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बोल्हाई चौकातून डावीकडे वळून साधू वासवानी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लष्कर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल देऊळमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांनी बॅनर्जी चौकातून वळून इच्छितस्थळी जावे,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in traffic in central city pune print news rbk 25 amy