श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून गुरुवारी (१ सप्टेंबर) पहाटे उत्सव मंडप परिसरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर चौक गुरूवारी पहाटे वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा, जिजामाता चौक, डावीकडे वळून गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक, गणेश पेठेतील महाराणा प्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक, उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौकमार्गे पुन्हा शिवाजी रस्त्यावर यावे.
हेही वाचा >>> पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, फुटका बुरुज, गाडगीळ पुतळा चौक, उजवीकडे वळून जिजामाता चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक, सोन्यामारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी विजय मारुती चौक, शुक्रवार पेठ पोलीस चौकी, नेहरु चौक, श्रीनाथ चित्रपटगृह, रामेश्वर चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.