पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे रविवारी उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा >>> भरधाव पीएमपी बसची प्रवाशांना धडक, नेहरु रस्त्यावर अपघात; बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग परिसरातील जमनालाल बजाज पुतळा परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार जेधे चौक ते जमनालाल बजाज पुतळा दरम्यान दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येईल. आवश्यकतेनुसार या भागातील वाहतूक बंदही ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी जेधे चौकातून व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्त्याने उड्डाणपुलावरुन सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.

हेही वाचा >>> आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘हवामान अर्थसंकल्प’

शिवाजीनगर न्यायालय परिसर वाहतूक बदल

शिवाजीनगर न्यायालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्ता परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक मार्ग आवश्यकता भासल्यास दुहेरी करण्यत येईल.