श्री शिवजयंतीनिमित्त मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी (१९ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यानंतर मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत नेहरु रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ‘भलेही धनुष्य हिरावून घ्याल, पण मनुष्य आजही मातोश्रीसोबत’; पुण्यात शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आंदोलन
शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्यावरुन लालमहाल चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी दारुवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक, बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक सोन्या मारुती चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर संत कबीर चौकातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका टॉकीज चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे तसेच बाजीरावर रस्त्याने फुटका बुरूज चौकाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात येईल. या भागातील वाहतूक केळकर रस्त्याने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन बालर्गधर्व चौकाकडे जावे.