लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या २७ मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त तळवडे, महाळुंगे, चाकण विभागातील वाहतुकीत २५ ते २७ मार्च दरम्यान बदल करण्यात आला आहे.
बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने देहूमध्ये येत असतात. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होत असते. त्यासाठी तळवडे, महाळुंगे, चाकण विभागातील वाहतुकीत २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते २७ मार्च रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूगाव कमान येथून जाणा-या सर्व वाहनांना तसेच महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे, आयटी पार्क चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल ते निघोजे, मोईफाटा मार्गे डायमंड चौकातून जातील. तळेगाव-चाकण रस्त्यावरुन देहूफाटा येथून देहूगावकडे जाता येणार नाही. या मार्गावरील वाहने एच.पी.चौकातून जातील.
आणखी वाचा- पुणे : शिंदे सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा
नाशिक-पुणे मार्गावरील चाकण, तळेगाव चौक, स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे कॅनबे चौकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने मोशी भारतमाता चौक, महिंद्रा सर्कल-इन्डुरन्स, एचपी चौक मार्गे जातील. देहू कमान ते १४ टाळकरी कमान, भैरवनाथ चौक, खंडेलवाल चौक ते देहूकमान, परंडवाल चौक हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असणार आहे. जुना पालखी मार्ग ते झेंडे मळ्यामार्गे जाणारी वाहतूक एकदिशा मार्ग (वन-वे) असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बस आणि दिंडीतील वाहने यातून वगळली आहेत, याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी प्रसृत केले आहेत.
मंदिर परिसरात विक्रेत्यांना प्रतिबंध
मंदिर परिसराच्या दोन्ही बाजूला फुले, फळे, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले बसल्यामुळे रस्त्यांची रुंदी लहान होते. पायी जाणा-या भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर, देहूगाव मुख्य कमान ते १४ टाळकरी कमान, मुख्य मंदिरासमोरील रस्ता, भैरवनाथ चौक या परिसरात २६, २७ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत फेरीवाले, पथारीवाले यांना बसण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रसृत केले आहेत.
आणखी वाचा- सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…
बीज सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. गावात स्वच्छतेची कामे करण्यात येत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून मुख्य देऊळवाडा आणि १४ टाळकरी कमान स्वच्छ पाण्याने धुवून काढण्यात आली आहे. वैकुंठगमन सोहळ्याच्या ठिकाणी इंद्रायणी नदी घाटावर दिवे बसविण्यात आले आहेत. गावातील सर्व रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहे. यात्राकाळात चोवीस तास विद्युत पुरवठा आणि पिण्याचे पाणी. विविध ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.