पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. त्यात उमेदवारांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असून, या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल.
हेही वाचा <<< विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम
हेही वाचा <<< पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे विविध भरतींसाठी उमेदवारांची अंतिम शिफारस यादी करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी एमपीएससीच्या कार्यनियमावलीतील २३ जुलै २०२०च्या सुधारणेद्वारे करण्यात आलेल्या निकषांनुसार निश्चित केली जाते. मात्र या निकषांचा साकल्याने विचार करून हे निकष रद्द करून एमपीएससीच्या १६ मे २०१४च्या कार्यनियमावलीतील नियम १० उपनियम (७) मधील नमूद निकषांनुसार करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार उमेदवाराने अर्ज करताना असलेले उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पीएच.डी., एम.फिल., पदव्युत्तर पदवी, दूरशिक्षणाद्वारे पदव्युत्तर पदवी, उच्च शिक्षणातील पात्रता धारण करण्याची तारीख, जाहिरातीमधील पसंतीची पात्रता, जाहिरात, परिपत्रक, भरतीचे नियम यात तरतूद केलेली असल्यास मागासवर्गीय समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास वर्ग, भटके विमुक्त आदींतील उमेदवार, अधिकचे वय, आडनावातील आद्याक्षर या क्रमाने केली जाईल. तर पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी क्रमवारी करताना पदवी आणि अनुभव, बारावी आणि अनुभव, दहावी आणि अनुभव या क्रमाने केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा <<< खडकवासला, पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल. तसेच एमपीएससीच्या कार्यनियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीत सुधारणा झात्याचे असे समजून प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.