स्पर्धेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तोडगा
समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या संघटनांमध्ये आणखी एका संघटनेची भर पडली आहे. ही संघटना आहे तयार पोळ्या किंवा चपात्या पुरवणाऱ्या व्यावसायिकांची. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा हे या संघटनेचे कार्यक्षेत्र असून आतापर्यंत सव्वाशे व्यावसायिक संघटनेत सहभागी झाले आहेत. आपापसातील स्पर्धा, दर पाडापाडीचे राजकारण, त्यातून होणारा संघर्ष आणि सरतेशेवटी सर्वाचेच नुकसान या गोष्टी टाळण्यासाठी संघटना स्थापनेचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे.
पुणे परिसरात पोळ्या तयार करणारे दोनशेहून अधिक व्यावसायिक आहेत. त्यांच्यामार्फत दररोज ३० ते ३५ लाख पोळ्या तयार केल्या जातात. हिंजवडी आयटी पार्क, तळेगाव, भोसरी तसेच रांजणगाव एमआयडीसी, खराडी, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध हॉटेल, केटर्स या ठिकाणी त्या वितरित केल्या जातात. या पोळ्या तयार करणारे सर्व व्यावसायिक संघटनेत यावेत, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांचे नुकसान करायचे नाही, असा ठराव पहिल्याच बैठकीत करण्यात आला. आपापसातील स्पर्धा टाळून समान दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे.
हेमंत महामुनी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांना पोळ्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांची गरज वाटू लागली. ती पूर्ण करण्यासाठी अनेकजण या व्यवसायात उतरले. कंपन्यांनी एकमेकांचे दर पाडले. त्याचा परिणाम सर्वाच्याच नफ्यावर होऊ लागला. इंधन दरवाढ, महागाई अशा अनेक गोष्टी असल्या तरी, कंपन्यांकडून अपेक्षित दरवाढ मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून सर्वानी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
कंपन्या व्यावसायिकांमध्ये स्पर्धा लावून देतात. आम्ही व्यावसायिकही त्यास बळी पडतो. कंपन्यांचा फायदा असला तरी आमचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. – हेमकांत महामुनी, अध्यक्ष, चपाती व्यावसायिक संघटना