मोदी, फडणवीस, ठाकरे यांच्या नावावर फुली; अजित पवारांच्या हस्ते शनिवारी स्मारकाचे उद्घाटन
चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम सुरू झाल्यानंतर जवळपास सहा वर्षे रखडले. जेव्हा ते पूर्णत्वाच्या मार्गावर आले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरणाचा सोहळा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, िपपरी पालिकेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असल्याने आणि निवडणुकांच्या तोंडावर अन्य कोणाला श्रेय मिळू नये म्हणून घाईघाईने अजित पवारांच्याच हस्ते स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्या हुतात्मा दामोदर हरि चापेकर, बाळकृष्ण हरि चापेकर, वासुदेव हरि चापेकर आणि महादेव गोविंद रानडे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प चिंचवडगावात उभारण्याचा निर्णय पालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला. बऱ्याच विलंबानंतर म्हणजे २५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळय़ा टप्प्यांवर प्रकल्पाचे काम रखडत होते. पुतळय़ांची उंची कमी असल्याने नव्याने पुतळे करावे लागले. स्मारकाचे काम पूर्ण होणार तरी कधी, हाच प्रश्न सातत्याने विचारला जात होता. मात्र, कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. महापालिका, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत होते. पोलिसांनी काही आक्षेप नोंदवले. वाहतूक पोलिसांनी त्रुटी काढली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळण्याचे कारण अनेक महिने दिले जात होते. अखेर, सर्व अडथळे दूर झाले व आवश्यक ते ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही मिळाले. नाशिकला तयार असलेले पुतळे पालिकेच्या ताब्यात मिळाले, तेव्हा उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला.
राष्ट्रवादीचे अॅड. संदीप चिंचवडे व शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे हे नगरसेवक या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. उद्घाटनासाठी अनुक्रमे शरद पवार, अजित पवार तसेच उद्धव ठाकरे उपस्थित राहावेत, अशी त्यांची मागणी आहे. भाजप व संघ परिवाराशी संबंधित घटकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याची इच्छा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मानस होता. त्यादृष्टीने भाजप परिवारात हालचाली सुरू होत्या. स्मारकाचे अनावरण क्रांतिदिनी (९ ऑगस्ट) घेण्याच्या दृष्टीने नियोजन होत होते, मात्र, या सगळय़ा गोष्टींना खोडा घालण्याची खेळी राष्ट्रवादीने केली. अजितदादांच्या नऊ जुलैच्या दौऱ्यातच हे अनावरण उरकण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. ज्या प्रकल्पाचे काम जवळपास आठ वर्षे रखडले, त्याचे अनावरण करण्यासाठी क्रांतिदिनापर्यंत न थांबता राष्ट्रवादीने अन्य कोणत्या पक्षाला अथवा नेत्याला श्रेय मिळू न देण्याची पुरेपूर खबरदारी घेतली.
शिवसेना व राष्ट्रवादीची छुपी युती
अजित पवारांच्या हस्ते चापेकरांच्या स्मारकाचे अनावरण करण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे यांना पुढे करून भाजपने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अजितदादांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण होणे म्हणजे चापेकरांच्या बलिदानाची अवहेलना आहे. क्रांतिकारकांचा अवमान होऊ नये, यासाठी अजितदादांऐवजी समाजासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांच्या हस्ते अनावरण करावे, अशी मागणी शेडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुतळा उभारण्यास राष्ट्रवादीला १० वर्षे लागली, मात्र श्रेयासाठी घाईने अनावरण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांमुळे परवानगी मिळाली, हे लक्षात घेतले पाहिजे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची छुपी युती झाली आहे, असे शेडगे यांनी म्हटले आहे.
आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री उद्घाटनासाठी आले असते तर आम्ही स्वागतच केले असते. परवानगी मिळत नव्हती म्हणून उद्घाटन होत नव्हते. ती मिळताच उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. श्रेय घेण्यासाठी घाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
– मंगला कदम, सत्तारूढ पक्षनेत्या, पिंपरी पालिका