पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून केल्याप्रकरणी २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले. आंदेकर यांचा खून टोळीयुद्ध, तसेच मालमत्तेच्या वादातून गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी नाना पेठेत झाला होता. याप्रकरणात गुंड सोमनाथ गायकवाड, तसेच आांदेकर यांची बहीण संजीवनी, मेहुणे जयंत, गणेश, प्रकाश कोमकर यांच्यासह २१ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती.
आंदेकर खून प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात ३९ साक्षीदारांचे जबाब सादर करण्यात आले आहेत, तसेच खून प्रकरणात आरोपींचे संभाषण (तांत्रिक विश्लेषण), सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी आरोपपत्रासोबत सादर केले. आरोपींकडून आठ पिस्तुले, सात काडतुसे, सात कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. आंदेकर खून प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल करण्यास तीन वेळा मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर शुक्रवारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त, तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांच्यामार्फत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मालमत्ता आणि टोळीयुद्धातून आंदेकर यांचा १ सप्टेंबर २०२४ राेजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात रात्री नऊच्या सुमारास पिस्तुलातून गाेळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. आंदेकर यांची बहीण संजीवनी हिचे नाना पेठेत दुकान होते. दुकानावर महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. आंदेकर यांच्या सांगण्यावरुन कारवाई करण्यात आली, असा आरोप संजीवनीने केला होता. त्यानंतर संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, गुंड सोमनाथ गायकवाड यांनी साथीदारांशी संगनमत करुन आंदेकर यांच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखील आखाडे याचा २०२३ मध्ये नाना पेठेत आंदेकर टोळीतील सराइतांनी खून केला होता. आखाडेच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने खुनाचा कट रचला होता.
आरोपपत्रात काय ?
आरोपींकडून सात दुचाकी, तीन मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या. ३९ साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. आंदेकर खून प्रकरणात पाच ते सहा प्रत्यक्षदर्शी सक्षीदार आहेत. त्यांचेही जबाब आरोपपत्रासाेबत सादर करण्यात आले आहेत. याप्रकरणात दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध बाल न्याय मंडळात आरोपपत्र सादर करण्यात आले. आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी तीन वेळा मुदतवाढ घेतली हाेती. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवस आहेत. ’मकाेका’अन्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाकडून आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येते. खून प्रकरणातील आरोपी अभिषेक खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांनी मध्य प्रदेशातून पिस्तूले आणि काडतुसे आणली होती. याप्रकरणात पसार झालेल्या आरोपींना रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरातून अटक करण्यात आली होती.