पुणे : गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने मंगळवारी राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी धर्मादाय आयुक्तालयाने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये रुग्णावर आपत्कालीन स्थितीत योग्य उपचार करण्यात आले नाहीत, असा ठपका राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयाच्या अहवालामध्ये काय म्हटले आहे, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर होणार आहे, अशी माहिती माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्याचा आरोग्य विभाग, महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तालय अशा तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. याबाबत आतापर्यंत आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्तालयाने राज्य सरकाला अहवाल सादर केला आहे. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाल्यानंतर या तिन्ही अहवालांच्या आधारे कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.