शहराच्या विकास आराखडय़ासंबंधी नागरिक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी, नगरसेवक अशा सर्वानी केलेल्या सूचनांच्या आधारे भारतीय जनता पक्षातर्फे विकास आराखडय़ाची सनद प्रकाशित केली जाणार असून ही सनद तयार करण्याची प्रक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सुरू होत आहे.
पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराचा विकास आराखडा हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध झाला असून हा आराखडा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष फडणवीस रविवारी पुण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत निमंत्रित नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक सकाळी दहा वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर या बैठकीत फडणवीस चर्चा करणार आहेत. त्यानंतर पक्षातर्फे दुसऱ्या टप्प्यात नगरसेवक आणि नागरिकांकडून सूचना मागवण्यात येणार असून या सर्व प्रक्रियेनंतर पक्षातर्फे विकास आराखडय़ाशी संबंधित नागरिकांच्या मागणीची सनद प्रकाशित केली जाईल. सर्वसामान्य पुणेकर डोळ्यापुढे ठेवून शहराचा विकास हा शहर विकास आराखडय़ाचा हेतू असला पाहिजे. याच उद्देशाने ही सनद प्रकाशित केली जाईल, असे येनपुरे म्हणाले.
शहर विकासाची सनद प्रकाशित करण्याबरोबरच नागरिकांनी या आराखडय़ाला मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचना द्याव्यात यासाठीही पक्षातर्फे प्रत्येक प्रभागात प्रयत्न केले जाणार आहेत. आराखडय़ात जी लोकोपयोगी आरक्षणे उठवण्यात आली आहेत, त्यांची माहिती नागरिकांना देण्याचीही व्यवस्था पक्षातर्फे त्या त्या जागेवर केली जाणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते आरक्षणे उठवलेल्या जागेवर आंदोलन करणार असून त्या भागातून नागरिकांच्या हरकती-सूचना गोळा करणार असल्याचेही येनपुरे यांनी सांगितले.

Story img Loader