चंदन हायगुंडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान विविध प्रकारे भारत विरोधी कारवाया करीत आला आहे. तेथील युवतींनी ऑनलाईन चॅटिंग करून भारतीय तरुणांना प्रेमप्रकरणात ओढायचे, मग या तरुणांकडून देश विरोधी कामे करून घ्यायची, असे एक षडयंत्र पाकिस्तानने आखले. असेच एक प्रकरण पुणे शहरात २००७ साली उघडकीस आले. पुणे पोलीस आणि केंद्रीय गुंप्तचर यंत्रणांनी सखोल तपास करून पाकिस्तानचा कट उधळून लावला. याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या संकेतस्थळावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

८ एप्रिल २००७ रोजी पुणे शहर पोलिसांनी विशाल नामक २५ वर्षीय तरुणास अटक केली. पुण्यातील विविध लष्करी इमारती, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणांचे फोटो व काही माहिती तो पाकिस्तानला पाठवणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. विशालच्या विरोधात क्राइम ब्रांचचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. क्राइम ब्रांचचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे गुन्ह्याचे तपास अधिकारी होते. पोलीस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक होती.

ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मूळचा झारखंडचा विशाल २००४ साली पुण्यात शिक्षणासाठी आला. पुण्यातील एका कॉलेजला त्याने प्रवेश घेतला. त्याला इंटरनेट चॅटींगचा नाद लागला. २००५ दरम्यान एका ‘चॅटरूम’मध्ये त्याची ओळख फातिमा नामक सुंदर पाकिस्तानी युवतीसोबत झाली. फातिमाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपला फोन नंबर दिला. हडपसर भागातील एसटीडी बूथ वरून विशाल या पाकिस्तानी नंबर वर वारंवार फोन करून फातिमा सोबत बोलायचा. त्याचे फोनचे बिल तब्बल दीड लाख रुपये झाले होते.

फातिमाने तिचे वडील सलाहुद्दीन माजी लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले. पोलीस तपासात सलाहुद्दीन पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ गुप्तहेर संघटनेशी संबंधित असल्याचे समजले. विशालने फोनवर फातिमाच्या आई वडिलांशीही बोलणे केले. धर्मांतर करून इस्लाम स्वीकारल्यास फातिमाशी लग्न लावून देण्याचे आश्वासन त्यांनी विशालला दिले. त्याला पाकिस्तानला भेटायला बोलावले. विशालने पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवायचा प्रयत्न केला, पण सुरवातीला त्याचा अर्ज नामंजूर झाला. मग सलाहुद्दीनने सांगितल्यानुसार विशालने दिल्लीतील ‘पाकिस्तान हाय कमिशन’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आणि मग काही दिवसात त्यांनी विशालला पाकिस्तानचा व्हिसा मिळवून दिला. फातिमाने पाकिस्तानातून विशालला पैसे पाठविल्याचे पुरावेही समोर आले.

पुढे ऑक्टोबर २००६ आणि जानेवारी २००७ दरम्यान विशाल दोन वेळा पाकिस्तानला गेला आणि कराची येथील फातिमाच्या घरी मुक्काम केला. पोलिसांना दिलेल्या जबाबात विशालने फातिमाच्या घरी राहणे, तिच्या कुटुंबियांसोबत झालेली चर्चा, तिच्यासोबत बागेत फिरायला जाणे अशी बरीच माहिती दिली आहे. जबाबात त्याने असेही सांगितले की फातिमाच्या वडिलांनी त्याला गुप्त ठिकाणी काही दिवस दहशतवादाचे प्रशिक्षण दिले आणि भारतात परतल्यावर पुण्यातील लष्कराच्या संस्था व इतर धार्मिक, संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवण्यास सांगितले. असे केल्यास भविष्यात फातिमासोबत लग्न लावून लंडनला स्थायिक होण्याचे आमिष त्याने विशालला दाखवले.

विशालने धर्म बदलण्यासाठी पुणे आणि मालेगावच्या मशिदीत भेटी दिल्या. तेथील मौलवींचे जबाब पोलिसांनी तपास करताना नोंदवले. पुण्यातील एका मौलावीने दिलेल्या जबाबानुसार त्याने फातिमाच्या वडिलांसोबत फोनवर बोलणे केले. मात्र विशालने कलमा वाचून पूर्वीच इस्लाम स्वीकारला आहे आणि त्याचे नाव बिलाल ठेवले आहे, असे फातिमाच्या वडिलांनी मौलवीला सांगितले.

दरम्यान विशालने पुण्यातील लष्करी संस्थांच्या इमारती, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘मोतीबाग’ कार्यालय याचे फोटो जमवले आणि इतर महत्वाची माहिती मिळवली. ही माहिती ‘सीडी’मधून तो पाकिस्तानला पाठविणार होता. पण त्याआधीच त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कडून सदर फोटो असलेली सीडी, सलाउद्दीनचे नाव, पत्ता असलेले पत्रपाकिट, अन्य काही कागदपत्रे, फातिमाचे फोटो इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात फातिमा, तिचे वडील सलाहुद्दीन, तसेच दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनचे दोन पाकिस्तानी अधीकारी सईद तिरमीझी आणि अब्दुल लतीफ यानाही षड्यंत्रकारी म्हणून आरोपी करण्यात आले. व्हिएना कन्व्हेन्शनच्या नियम-तरतुदीं मुळे या दोघांवर कारवाई करता आली नाही.

विशालने न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळले. पाकिस्तानला केवळ फातिमावर प्रेम असल्याने गेल्याचे त्याने सांगितले. मात्र पुरावे पाहता विशालने गुन्हा केल्याचे न्यायालयाने म्हटले. मार्च २०११ मध्ये न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी विशालला भरतोय दंड संविधान कलम १२० ब तसेच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्ष तुरंगवासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला मुक्त करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatroom to pakistan how a love affair landed pune student in isi spy plot scj