मॅट्रिमोनियल साईटवरून उच्चशिक्षित महिलेची ओळख करून फसवणूक करणारा नवा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड झाला आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रत्येकी दोन, तर नागपूरची एक अशा पाच महिलांचा विश्वास संपादन करीत या लखोबाने त्यांना फसविले असून काही जणींचे लैंगिक शोषण केल्याची बाब उघड झाली आहे.
शिवसेना कार्यकर्त्यां आणि जिल्हा दक्षता समिती सदस्या मनीषा धारणे यांनी सहकाऱ्यांसमवेत या भामटय़ाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विनयकुमार प्रकाशराव माने (वय ३२, रा. पाषाण, मूळ रा. बेंगळुरू) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ही महिला घटस्फोटित असून एका कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर आहे. तिने भारत मॅट्रिमोनियल साईटवर नोंदणी केली होती. माने यानेही तेथे घटस्फोटित म्हणून प्रोफाईल तयार केले होते. मानेची या महिलेसोबत ओळख झाली. आपण बेंगळुरू येथे एका मोबाईल कंपनीमध्ये कामाला असून लवकरच पत्नीशी घटस्फोट घेणार असल्याचे माने याने सांगितले. त्यानंतर त्याने या महिलेला विवाहाची मागणी घातली. दोघांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिल्यानंतर तो जूनमध्ये पुण्याला आला. मोबाईल कंपनीचे वितरण सुरू होणार असून विमाननगर भागामध्ये सदनिका घेऊन राहणार असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याच्या निवासाचा प्रश्न असल्याने या महिलेने त्याला आपल्या घरी राहण्याची संमती दिली. या कालावधीमध्ये त्याने लैंगिक शोषण केले असल्याचेही तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
माने याने या महिलेच्या नावावर गाडी घेण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज काढले. त्याचप्रमाणे एजन्सीसाठी २४ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र, संशय आल्याने मानेचा मोबाईल तपासला असता तो चार मुलींशी चॅटिंग करीत असून त्या चौघींनाही त्याने विवाहाचे आश्वासन दिले असल्याचे समजले. येरवडा भागातील एका महिलेकडून पैसे घेणार असल्याचा मोबाईल मेसेजही तिने पाहिला. हा प्रकार तिने मनीषा धारणे यांना सांगितला. धारणे यांनी दूरध्वनी करून दुसऱ्या महिलेशी संपर्क साधला तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. येरवडा येथील महिलेने माने याला पैसे देण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार माने तेथे गेला असता त्याला पकडून चतु:श्रुंगी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशाच पद्धतीने माने याने पाच मुलींची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा